Sunday, August 30, 2009

मावळतीची दिशा ..!!

" काय रे, किती वेळ एकटक पाहतोहेस त्या समुद्राकडे ? "
तिच्या या प्रश्नावर त्याने मान न वळवता एक हुंकार भरला. " आठवते का ग? आपण तास न तास इथे येऊन बसायचो नाही इथे ? तेव्हांपासून हा अस्साच आहे. कसलाही बदल नाही त्याच्यात !"

त्याच्या केसातून हात फिरवत ती म्हणाली " त्याला काय झाले बदलायला?" तिच्या चेह-यावर हसु विलसत होते " तू मात्र बदललास.. आठवतेय ना..चांदण्या वगैरे आणून द्यायच्या बाता मारायचास "

आता मात्र त्याने मान वळवून तिच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात रोखून पाहत मिस्किलपणे तो म्हणाला " अजूनही आवडतात का ग चांदण्या ?"
ती मान गुडघ्यात खुपसून स्वतःशीच हसत राहिली. त्यालाही मौज वाटली.

" किती वेडे होतो ग आपण ? "
" मला तरी अजून तो वेडेपणाच आवडतो..."
"बघ हं..."
" ए चुप्प बस..कुणी बघेल ना "
"आता काय धाड भरलीये? कुणाची भीती आहे?"
"भीती नाही साहेब.. लोक हासतील ना.."
"लोकांचे काय घेऊन बसलीस ?"
"हुं.. तुला काय रे.. पण वयाला शोभलं तरी पाहिजे ना "

तिच्या शेवटच्या वाक्याने तो एकदम ऒफमूड झाला. मावळतीच्या साक्षीने चेह-यावरचे रंग उतरत गेले.

" सॊरी हं.. तुझा मूड घालवला "
"इट्स ओके.. पण जाऊ दे आता.. मूड गेला तो गेलाच.. आता ही ट्रीप स्पॊईल झाली आपली "

तिच्या डोळ्यात आभाळ उतरलेले !!


त्यालाही वाईट वाटले.

" सॊरी गं.. इतकी वर्षे झाली पण माझ्यातही काही बदल नाही झाला. बघ दुखावलीस तू पुन्हा "

मळभ साफ झाल्यासारखे हसत तिने एक टप्पल दिली त्याला.


" आपली मुलं काय म्हणत असतील रे ?"
"काय म्हणणार ? म्हातारा म्हातारी नाही तर कटकट नाही आठवडाभर.. नाहीतर म्हणत असतील, या वयात लफडी करतात !"

" ए चल, आपली मुलं असे काही नाही म्हणणार रे..."

" हं"

"का रे?"

"तुलाही माहित आहे. महिन्याच्या सुरूवातीला पैसे मागावे लागतात. पेन्शन दहा दिवसात संपते. घरात काय हव काय नको आजही तूच पाहतेस. वेळ जावा म्हणून मी ही किराणा भरत होतो. पण आता ते माझेच काम झालेय. मागितल्याशिवाय पैसे मिळत नाहीत "

" जाऊ द्या हो. इतरांसारखी नाहीत आपली मुलं. व्यसन नाही. उलटं बोलणं नाही, वेगळं राहण्याचा हट्ट नाही.."


" वेगळं राहायला परवडत नाही आणि घरकामाला आपल्यासारखे जोडपे मिळत नाही "

"सोडा ना हो. आपण एन्जॊय करायला आलोय ना.. जुने दिवस आठवायचे.. भूतकाळात हरवून जायचं..काय ठरवलं होत निघताना ?"

अरे तुरे चे पुन्हा नकळत... अहो जाहो झाले होते...!


"हो ना.. पण कुणीतरी विचारले का..बाबा पैसे देऊ का? मी ही नाही मागितले.. तिरिमिरीत शेवटचे फिक्स डिपॊझिट तोडले.. सांगितले नाही तुला तेव्हां"
" अगबाई ! अहो, काय केलेत हे.. माहित आहे ना स्वप्नाची शाळेची फी भरायचीय.. राज ची तारांबळ उडेल हो अगदी !"

"अग तुला कशाला त्यांची काळजी ? आपण कधी जगायचे आपले आयुष्य ? केले कि त्यांच्यासाठी सर्व .. उडवायला पैसे असतात.. तेव्हां काही बोललो कि राग येतो..आणि आता बापाच्या फिक्स डिपॊझिट वर डोळा का ?"

"अहो, मुलांना दुःखी करून आपण कसे एन्जॊय करू शकतो ? त्यांच्या चेह-यावरच्या काळज्या पाहून का आपल्याला बरं वाटणार आहे ? आपलं काय संपलं आता.. मुलांच्या आयुष्यातच पुनःप्रत्ययाचा आनंद शोधायचा आपण आता "तो तिच्याकडे पाहत राहिला. ..

स्वतःचे अस्तित्त्व मुलांच्यात विलीन केलेल्या तिच्या चेह-यावर मावळतीच्या तांबूस छटा खुलून दिसत होत्या. संध्याकाळची ओहोटी सुरू झाली होती. रात्री चंद्र उगवल्यावर हा समुद्र असा नसेल...नकळत त्याला वाटून गेले.
वाळूत कितीतरी तरूण जोडपी बसली होती. स्वतःशीच हसत त्यांच्यावरून त्याची नजर फिरली.. यातले काही असेच आपल्यासारखे पुन्हा येऊन बसतील इथे ..

छत्रीचा आधार घेत सावकाश उठत त्याने तिला हाताचा आधार दिला. उठताना होणारे गुडघ्याचे कष्ट बाजूला सारत तिने चष्मा साफ करीत डोळ्यावर चढवला. पायाला जाणवणारा वाळूचा मऊ स्पर्श अनुभवत त्यांची पावले पुन्हा चालू लागली.. मावळतीच्या दिशेने !!

Friday, August 28, 2009

दमलेल्या बाबासाठी....

( दमलेल्या बाबाची कहाणी या संदीप खरे यांच्या गीतावरून त्यांच्या या कल्पनेला दाद द्यावेसे वाटल्याने
कवीची क्षमा मागून...... )

चार शब्द ऐक बाबा लेकीचेही आता

खुणावती तुला सा-या धावत्या वाटा..


बाबा बाबा थांब थोडा एक माझे जरा
आटू नको देऊ तुझा मायेचा हा झरा
रोजचीच येते रात, आईच्या कुशीत
पाहशील का रे बाबा तिची दमछाक

राबतोस माझ्यासाठी ठावे आहे मला
पुरेसा होई रे तुझ्या हातांचा हा झुला

ना ना ना ना ना ना ना ना,

गर्दीमध्ये चेंगरतो जीव तुझा बाबा
शिणलेल्या श्वासांमध्ये शोधते मी तुला
दमू नको बाबा माझा सांगते देवाला
विसावेल बाबा, थोडा वेळ दे ना त्याला ..


हसणारा खेळणारा, बाबा दे ना मला
बाबा तुझा देवा बघ रागवेल तुला
ऐकले ना माझे जर कट्टी मी घेईन
बाबासाठी लवकर मोठ्ठी मी होईन


पैशाचे रे एक झाड कुंडीत लावीन
माझ्यासाठी माझा बाबा मीच मिळवीन

ना ना ना ना. ना ना ना ना
Maitreyee Bhagwat

Wednesday, August 26, 2009

देवमाणूस

"चला सरकार, या गावातले आपले दाणापाणी संपले"

घाईघाईत आवश्यक सामान पेटीत कोंबत डॉक्टर म्हणाले. बाहेर ब्राह्मणांची घरे पेटत होती. जीव वाचवायला दोन तीन कुटूंबे डॉक्टरांच्या आश्रयाला आली होती. डॉक्टर सोमण म्हणजे देवमाणूस. डॉक्टरांच्या शब्दाला गावात मान होता. त्यामुळे इथे त्यांना सुरक्षित वाटत होते. प्रसंगी स्वत्।च्या खर्चाने अत्यवस्थ रूग्णांवर शहराच्या ठिकाणी उपचार करणा-या या देवमाणसाच्या वाटेला कुणी जाणार नाही याची खात्री होती. आज या समजाला धक्का बसला होता. न्हाव्याचा मुलगा इतक्यातच सावधानतेचा इशारा देऊन गेला होता आणि तरीही डोक्टरांचा त्याच्यावर विश्वास बसला नव्हता. गावावरच्या निस्सीम प्रेमाने त्यांचा विवेक नष्ट झाला होता.

खिडकीतून दूरवर पेटते पलिते घेतलेला मोर्चा दिसत होता. विचार करायला देखील वेळ नव्हता. दागदागिने, देव पैसा अडका आणि डिग्रीचे प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे त्यांनी पेटीत कोंबली.

अर्धांगिनीने भांड्यांचे काय असे विचारताच डॉक्टर खेकसलेच. बर्वे नुसतेच बघत होते. डॉक्टर पुन्हा ओरडले तेव्हां त्याम्णि बांधाबांध सुरू केली. जुजबी सामान घ्या म्हणून डॉक्टर ओरडत होते. पुढच्या दाराने जायचे नाही हा निर्णय झाला.

पडवीत न्हाव्याचा गण्या बैलगाडी घेऊन वाट बघत होता. डॉक्टरांच्या डोळ्यांत पाणी उभे राहिले.

"कुठल्या जन्मीचे ॠणानुबंध होते रे गण्या ?" हे विचारतांना त्यांचा गळा भरून आला होता. गण्या काही न बोलता जवळ आला. उत्तरादाखल त्याने डॉक्टरांच्या पायाला हात लावला. सोमणकाकूनी चेहरा हाताच्या ओंजलीत झाकून घेतला. डॉक्टरांच्या पायांना गरम अश्रूंचा स्पर्श झाला. त्यांनी काही न बोलता गण्याला उठवून घट्ट मिठी मारली आणि ते चक्क रडू लागले. गण्याने त्याही प्रसंगात डॉक्टरांना जवळजवळ ढकललेच""

"डॉक्टर ..वेळ न्हाई ..चला लवकर"

डॉक्टर भानावर आले. कांहीतरी विसरल्यासारखे ते घरात धावत गेले. क्षणार्धात ते पुन्हा आले. येतांना त्यांच्या हातात गांधीजींचा हसरा फोटो होता.आयुष्यभर गांधीवादी राहिलेल्या त्यांना आज या महात्म्याच्या हत्येच्या रोषाला बळी पडावे लागत होते..

रात्रीच्या अंधारात बैलगाडी चालू लागली. गण्याने पक्की सडक टाळायचा धूर्तपणा दाखवला होता. पलीकडे एक दोन मैलावर खिंडीमध्ये पलिते नाचताना दिसत होते. काय झाले असते या विचारानेच अंगावर सरसरून काटा आला. बर्वे हात जोडून बसले होते. बोकिलांनी मस्त ताणून दिली होती. सुखी माणूस..डॉक्टरांच्या मनात विचार आला.

" गण्या, एस टी च्या स्टँडावर घे म्हणजे आम्ही सुटलो..पुण्याला जाऊन बघावं म्हणतोय "

" डॉक्टर, स्टँडावर बी वाट बघत असत्याल.."

" मग रे.. ??"

"दमा कि वाईच.. टूरिंग थेटरचा मुक्काम उठलाया.. ती बी जाणार हाईत पुण्याला.. मालक माज्या ओळखीचा हाय. कायतरी येवस्था करतो "

रात्रीचे गार वारे सुटले होते. डोळे पेंगत असले तरी झोप लागत नव्हती. काळरात्र होती ती. आकाशात चंद्राला काळ्या ढगांनी गवसनी घातली होती. मिणमिणत्या चांद्ण्यांचाच काय तो आधार होता.

आपल्यामागे घराचे काय झाले असेल ? विचार स्वस्थ बसत नव्हते. त्याच वेळी जिवाची भीतीही वाटत होती.

Tuesday, August 25, 2009

बिग बँग .........!!

अंधारगर्भ सूक्ष्म पोकळी
अंतराळ व्यापणारी,
आंत आंत खेचणारी, घनकाळी
कुठवर खेचतात या, टोकदार भावना
जुलमातून जन्मणा-या, गेस्टापोंच्या यातना
किती झटले, झिजले, धावले, पडले, राबले
पदरी पडले, बाभूळवाणे, वार जिव्हारी..तुटले !
खोल खोल दर्यात, उमटते काळजातली थंड लहर
विस्फारत जाते, चिस्तारत येते, विनाशकारी कॄष्णविवर

धूसर धूम्मस, गर्भार तम्मस
आकंदित मन, शराग्री कसकस
धूसफूसते ज्वालामूखी
उफाळतो लाव्हारस
दलदलीत फसतो
आक्रोशतो जीवनरस

कोलमडण्याआधी माझ्यात मी
व्हावा एक महास्फोट
प्रसवेल मग सुशांत सॄष्टी
हॊऊदे मजवरी
इतुकीच रे कॄपादॄष्टी !


मैत्रेयी भागवत
१८ ऒगस्ट २००८

वाडा चिरेबंदी

मरूभूमीतील वाडा एकाकी
भयाण असा कि भितो स्वतःला
हालचाल पहा नागिणींची
साथ लाभते घन तिमिराची

वाघुळांना भय कसे ना
घुबडांच्या ह्या चित्कारांचे
बंद कधीचे कालद्वार हे
ध्वनी घुमते फुत्कारांचे..

डोळ्यांमधली आसवे ही
द्वारामागे चटकन लपली
एक फुलते रोप हिरवे
चिरेबंदी त्या भिंतीसवे

नागिणींचे भय वाटले
हिरवाईमधे मन दाटले
सांग हरी मी काय करू
कि द्वारामागे झुरून मरू..!!


मैत्रेयी भागवत
६ नोव्हेंबर २००८
८.४३ रात्रौ..