Friday, September 11, 2009

अजगर !!

तिच्याकडे पाहून तो हसला.. पण ते सूक्ष्म हसणेही तिच्या नजरेतून सुटले नाही..सुखावली ती..

"काय वं धनी..अस का बघता माज्याकडं "

"हिरॉइन दिसतीय ..अक्षी शबाना आझमी वानी "

" ऑ !! शबाना आझमी..ते वं का ? ऐशर्या का नाय ?"

दीर्घ उसासा घेत, चपलात पाय सरकवत तो काहीतरी करवादला..बाहेर पडतानाचे ते वाक्य तिला ऐकू आले .." आपल्यासारक्याला परडाय नग ?"

स्वप्नं देखील मोजून मापून पाहण्याची सवयच जडली होती गावाला. गेल्या महिन्यात हाहा:कार उडाला होता. उभं पीक पाण्यावाचून गेलं होतं..सावकाराचा तगादा सुरू झाला होता...जमीन नावावर करण्यावाचून गत्यंतर नव्हतं.
महिनाहरात दोन आत्महत्या झाल्या. रामा गेला आणि पंधरा वीस दिवसांच्या अंतराने शिर्पा पण गेला !
आपल्यापुरते तरी समस्यांचे उत्तर त्यांनी शोधले होते. संसार उघडे पडले होते. कच्चीबच्ची भूक लागल्यावर शेजारीपाजारी फिरत होती.. सुरूवातीची सहानुभूती आता ओसरली होती. आता आयका खेकसायला लागल्या होत्या..
जात्यातले भरडले गेले होते..सुपातले धास्तावलेलेच होते.

जख्ख म्हाता-या आईच्या चेह-यावर दुष्काळ दिसत होता. तिच्या चेह-यावरच्या सुरकुत्या शेतातल्या काळ्या मातीत पसरल्या होत्या. आकाशात भास्कर आग ओकत होता. दॉरवर कुठेही काळ्या मेघांचा मागमूस नव्हता. खुरटलेल्या झाडीसारखी त्याच्या डोळ्यातली आशा मावळत चालली होती. गेल्या दुष्काळात याच झाडाला बा नं टांगून घेतलं होतं. त्याला उतरवून घेताना हृदयात झालेली कालवाकालव आजही ताजी होती.

ढेकळातून असाच किती वेळ चालत होता कुणास ठाऊक...अचानक कुणीतरी त्याला ओढल्याने तंद्री भंग पावली. ""

पाबळीत नगं जाऊ ...! " शिवा कानातच ओरडला....अजगर हाय तिथं अजगर !!
भानावर येऊन त्याने शिवाकडे पाहिलं... पाबळीकडं आपण कसे काय वळालो त्याला आठवेना.. तंद्रीत बकरीच्या पिल्लामागं पावलं ओढत राहिली होती. या पिल्लानं त्याला लळा लावला होता. बा परत आलाय...त्याने मनाची समजूत घातली होती.

पिलू दिसत नव्हते...त्याच्या काळजात धस्स झालं !!

पाबळीत हालचाल दिसली म्हणून शिवाचा हात झिडकारून तो पळत सुटला.
आटलेल्या पाण्याच्या झ-याच्या आडोशाने इथे हिरवाई दिसत होती. पाण्यासाठी जनावर इथे येत होते..आणि इथेच तो दबा धरून असला होता...अजगर !!!

पिलू इथेच आले असले पाहिजे. वेड्यासारखा तो पिलाला पहात होता.. हाका मारत होता ..

आणि त्याला पिलाचा आवाज आला....केविलवाणा !!

घात झाला होता..पाठीमागून त्याला अजगाराने गिळले होते.. डोळ्यासमोर त्याचा बा अजगाराच्या कराल दाढेत चालला होता. पिलाच्या डोळ्यातला आकोश त्याच्यापर्यंत पोहोचत होता. तो स्तब्ध होऊन पहात होता...असहाय्य !!

मस्तवाल अजगर पिलाला गिळत होता.. घरी गेल्यावर आज दूध काढताना त्याच्या आईला काय उत्तर द्यायचे ? तिचा पान्हा आटला तर....आपल्या पिलांचे काय होणार ?

एक क्षण असा आला कि त्याच्या डोक्यातच तिडीक गेली. अजगराच्या भयाची जागा आता संतापाने घेतली. तावातावाने त्याने तिथली एक टोकदार आणि जड फांदी उचलली. कसलाही विचार न करता अजगरावर वार करायला सुरूवात केली. शिवा लांबूनच हे दॄश्य पहात होता....थिजलेल्या नजरेने...!

बेभान होत त्याने वेगाने वार सुरूच ठेवले होते. भक्ष्य गिळत असलेला अजगर प्रतिकार करू शकत नाही. सुस्तावून पडलेल्या त्या दैत्याला बचावाची संधीचबमिळू द्यायची नाही हा निश्चयच केला होता त्याने... घामाने निथळेपर्यंत त्याचे हे काम चालू होते..

अजगराने ते पिलू ओकून टाकले होते. ते ही निपचीत पडलेले होते. भीतीने त्याचा जीव कधीच गेला होता...

अजगरासारखाच तो गलितगात्र होऊन पडला होता..हताश ..खिन्न !!

कसेबसे आपले प्राण एकवटून त्याने रानाकडे चालायला सुरूवात केली. गावात पोहोचताच त्याला सावकाराचा निरोप आला.. त्याचा जीव खालीवर झाला.

सायंकाळच्या कॄष्णछाया घरांच्या ओसरीवर वाकुल्या दाखवू लागल्या होत्या...उघडे बोडके आकाश त्याच्याकडे निर्विकारपने पहात होते. तांबूस छटांनाही खिन्नतेची झालर दिसत होती,

मनातले मळभ झटकत तो वाड्यावर पोहोचला.

त्याला पाहताच सावकार दारापर्यंत आला. नाटकीपणे त्याच्याकडे पहात तोंड भरून हसला.

"मुदत संपली ना बाबा ? झाली का व्य्वस्था ?"

खाली मान घालून तो असहाय्यपणे अंगठाने जमीन टोकरत राहिला.

" देवाने तोंडात जुबान दिली हाय ना.. बोल ना...काय करायच ?"

बा ने याच्या बहिणीच्या लग्नासाठी काढलेले कर्ज फेडण्यासाठी त्याने वर्षभराची मुदत मागितली होती. पीक घ्यायला बियाणे लागणार होते.. त्यासाठी थोडेसे कर्ज घेताना यावेळी सगळीच जमीन गहाण टाकायला लागली होती.

" समजले....काय बी बोलायच नाय आता...तुजी अडचण मी जाणते..पण माजा पैसा अडकला बाबा...व्यवहारापुढं नाईलाज हाय बाबा "

त्याच्या कानात हे वाक्य गरम शिशासारखं ओतलं जात होतं अर्थ स्वच्छ होता... जमीन गेली होती. त्याला घेरी आल्यासारखं वाटत होतं

त्याच्या डोळ्यापुढं म्हातारी, तीन पोरं आणि बायको या सर्वांचे चेहरे फेर धरून नाचत होते... त्याला मदतीची हाक मारत होते.. त्याच्या डोळ्यात पाहत होते.

आणि त्यांची नजर...

त्याला बकरीच्या पिलाची आठवण झाली. त्या पिलाची नजर...त्याला गिळणारा अजगर !

सावकार हसत होता.. त्याचा हात धरून अंगठे उठवायचे काम करत होता.

दुपार्चा तो त्वेष ..ते वेड्यासारखे अजगराला भिडणे.... पिलाची सुटका नाहीच झाली पण जिवंतपणी..

अंगठे उठवायचे काम झाले होते.

पाबळीतला जखमी अजगर हालचाल करायला लागला होता... आता तो अधिकच धोकादायक झाला होता !!

*****

Maitreyee Bhagwat
11.9.2009

Thursday, September 3, 2009

काही सुचत नाही तेव्हां


काही सुचत नाही तेव्हां
ढगांवर पडून रहावं
लाटालाटांनी पसरत
मस्त झिरपत रहावं

काही सुचत नाही तेव्हां
शब्द चिवडत रहावं
इंद्रधनुष्यावर बसून
रंगात न्हात रहावं

काहीच सुचत नाही तेव्हां
पंख लावून फिरावं
फुलपाखराकडे पाहून
स्वतःवरच हसावं

काही सुचत नाही तेव्हां
अंधार ओढून घ्यावा
रात्रीला विनवून थोडा
वेळ मागून घ्यावा

काही सुचत नाही तेव्हां
कवितेला जवळ घ्यावे
शेवटच्या पंक्ती आठवून
डोळे मिटून घ्यावे

Maitreyee
03.09.2009