Sunday, September 22, 2013

मै आजाद हूं (१९८९) ते अण्णा हजारे ( २०११) !

टिनू आनंद दिग्दर्शित मै आजाद हू असं शिर्षक असलेला अमिताभपट आठवतो का ?

खरं तर रूढ अर्थाने हा अमिताभपट नाहीच. यातला नायक लार्जर दॅन लाईफ नाही. तर नायकाची बनवण्यात आलेली इमेज कशी लार्जर दॅन लाईफ असू शकते यावर भाष्य करणारा हा ऑफ बीट सिनेमा खूप अंगांने वेगळा होता. अमिताभच्या खात्यात या सिनेमामुळे एक चांगला सिनेमा जमा झाला. मात्र चांगला असूनही सिनेमा चालला नाही :(  (हे मुद्दाम सांगायला नकोच ) 

एक बेरोजगार युवक खेड्यातून शहरात येतो.  नोकरीच्या शोधात असताना एका आदर्श महिला पत्रकाराशी, सुभाषिनीशी (शबाना आझमी) त्याची गाठ पडते.  सुभाषिनी तिच्या वर्तमानपत्रातून् नेहमी भ्रष्टाचारावर बेधडक लिहीत आलेली आहे. आता हे पत्र नवीन मालकाकडे गेलेले आहे. त्यांच्या नव्या पॉलिसीनुसार सुभाषिनीसारख्यांना नारळ मिळणार हे उघड असतं.

अशातच एके दिवशी सुभाषिनीच्या नावे त्या वर्तमानपत्रात आझाद नावाचा एक तरूण देशातलं वातावरण, राजकारण आणि भ्रष्टाचार या विरोधात २६ जानेवारी या दिवशी एका उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करणार असल्याचा इशार देतो.  ही जाहिरात चक्क खोटी असते. पण नवीन मालक शेठ गोकुळचंद यांना त्यात भविष्य दिसून येतं. अतिशय धूर्त असलेला हा नेता आझाद या संकल्पनेला खतपाणी घालतो. त्या नावाने एक कॉलम चालू होतो. एक भारावलेपण तयार होतं. आझाद या नावाचं भूत समाजात थैमान घालू लागतं.

आता या आझादला चेहरा हवा असतो. अमिताभ बच्चन हा गर्दीतल्या कुठल्याही निनावी मनुष्याचा चेहरा सुभाषिनी हेरते आणि त्याला आझाद बनण्याची ऑफर देते. आझाद बनणे हे एक उच्च कोटीचं देशकार्य असल्याचा त्याचा समज करून दिला जातो.

आणि आधीच लोकप्रिय झालेल्या आझाद्ला पहायला झुंबड उडते. पत्रकार, गरीब, श्रीमंत, सुशिक्षित, अशिक्षित, महिला, पुरूष या सर्वांना आपला तारणहार आझाद मधे दिसू लागतो.  आझाद ही एक प्रतिमा असते जी लार्जर दॅन लाईफ असते. ही प्रतिमा वागवताना आझादची दमछाक होऊ लागते. भाबड्या जनतेने केलेलं त्याचं दैवतीकरण कुठेतरी त्याच्या आत्म्याला अस्वस्थ करू लागतं. त्याचा मानसिक संघर्ष सुरू होतो आणि जनतेला आपण फसवत असल्याची बोच त्याला अस्वस्थ करू लागते. आपला वापर झाला ही भावना त्याला अस्वस्थ करून टाकते.

पिंजरा या सिनेमात गुरूजींची प्रतिमा जपण्यासाठी त्यातला नायक स्वतःच्या मृत्यूचा बनाव करून आपल्या अस्तित्वावर जिवंतपणी फुली मारतो. इथे मात्र आझादची जी प्रतिमा लोकांच्या मनात आहे तिला धक्का लागू नये म्हणून नायक २६ जानेवारी य दिवशी त्या इमारतीवरून खरोखरच उडी मारून स्वतःचं आयुष्य संपवतो.

हा सिनेमा पाहताना अशा प्रकारे आझादच दैवतीकरण खरोखरच्या आयुष्यात शक्य आहे का ? जनता अशी कुणाच्याही मागे जाऊ शकेल का असे प्रश्न पडले होते. अर्थात आझादची व्यक्तिरेखा इतक्या ताकदीने लिहीली गेली होती कि हे प्रश्न फार काळ टिकले नाहीत. आज मात्र या प्रश्नांची उत्तरं मिळू पाहताहेत. आझाद ही फँटसी नाही. असं खरच घडू शकतं असं चित्र समोर येतंय.

सिनेमाचा प्लॉट दहा पंधरा वर्षांपूर्वीचा आहे. अशा पद्धतीने लोकांपुढे आयकॉन ठेवणे शक्य आहे आणि माध्यमांच्या शक्तीद्वारे त्याचे गौरवीकरण करणे शक्य आहे असा विचार लेखकाला सुचला त्याबद्दल श्रीयुत जावेद अख्तर यांना आज साष्टांग दंडवत घालावंसं वाटतंय. हे सिनेमाचं रसग्रहण नाही. सिनेमात मांडलेली कथा प्रत्यक्षात येताना दिसतेय म्हणून हा लेखनप्रपंच. आज आझादच्या जागेवर अण्णा आहेत. अण्णांच्या मागे भारावलेली जनता आहे. व्यवस्थेविरूद्धची तीच चीड आहे, त्यातूनच नवा तारणहार त्यांनी अण्णांमधे शोधलेला आहे. आज अण्णांची मूर्ती लार्जर दॅन लाईफ आहे. आझादच्या प्रतिमेशी तिचं साम्य आहे. आझाद प्रमाणेच अण्णा या प्रतिमेच्या मागे आज एक जनआंदोलन उभे राहीलेलं आहे. या प्रतिमेवर प्रेम करणा-या हताश नागरिकांना मिळालेला हा आजचा आझाद आहे.

या पार्श्वभूमीवर या सिनेमाची झालेली ही अपरिहार्य आठवण,  बस्स इतकंच !


 टीप :  हा सिनेमा देखील एका जुन्या इंग्लीश सिनेमावर बेतलाय.  Meet John Doe (1941)  असं त्या सिनेमाचं नाव आहे. अर्थात जॉन डो या कॅरेक्टरसाठी त्यात मुलाखती घेण्यात येतात हाच काय तो फरक.