Wednesday, August 26, 2009

देवमाणूस

"चला सरकार, या गावातले आपले दाणापाणी संपले"

घाईघाईत आवश्यक सामान पेटीत कोंबत डॉक्टर म्हणाले. बाहेर ब्राह्मणांची घरे पेटत होती. जीव वाचवायला दोन तीन कुटूंबे डॉक्टरांच्या आश्रयाला आली होती. डॉक्टर सोमण म्हणजे देवमाणूस. डॉक्टरांच्या शब्दाला गावात मान होता. त्यामुळे इथे त्यांना सुरक्षित वाटत होते. प्रसंगी स्वत्।च्या खर्चाने अत्यवस्थ रूग्णांवर शहराच्या ठिकाणी उपचार करणा-या या देवमाणसाच्या वाटेला कुणी जाणार नाही याची खात्री होती. आज या समजाला धक्का बसला होता. न्हाव्याचा मुलगा इतक्यातच सावधानतेचा इशारा देऊन गेला होता आणि तरीही डोक्टरांचा त्याच्यावर विश्वास बसला नव्हता. गावावरच्या निस्सीम प्रेमाने त्यांचा विवेक नष्ट झाला होता.

खिडकीतून दूरवर पेटते पलिते घेतलेला मोर्चा दिसत होता. विचार करायला देखील वेळ नव्हता. दागदागिने, देव पैसा अडका आणि डिग्रीचे प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे त्यांनी पेटीत कोंबली.

अर्धांगिनीने भांड्यांचे काय असे विचारताच डॉक्टर खेकसलेच. बर्वे नुसतेच बघत होते. डॉक्टर पुन्हा ओरडले तेव्हां त्याम्णि बांधाबांध सुरू केली. जुजबी सामान घ्या म्हणून डॉक्टर ओरडत होते. पुढच्या दाराने जायचे नाही हा निर्णय झाला.

पडवीत न्हाव्याचा गण्या बैलगाडी घेऊन वाट बघत होता. डॉक्टरांच्या डोळ्यांत पाणी उभे राहिले.

"कुठल्या जन्मीचे ॠणानुबंध होते रे गण्या ?" हे विचारतांना त्यांचा गळा भरून आला होता. गण्या काही न बोलता जवळ आला. उत्तरादाखल त्याने डॉक्टरांच्या पायाला हात लावला. सोमणकाकूनी चेहरा हाताच्या ओंजलीत झाकून घेतला. डॉक्टरांच्या पायांना गरम अश्रूंचा स्पर्श झाला. त्यांनी काही न बोलता गण्याला उठवून घट्ट मिठी मारली आणि ते चक्क रडू लागले. गण्याने त्याही प्रसंगात डॉक्टरांना जवळजवळ ढकललेच""

"डॉक्टर ..वेळ न्हाई ..चला लवकर"

डॉक्टर भानावर आले. कांहीतरी विसरल्यासारखे ते घरात धावत गेले. क्षणार्धात ते पुन्हा आले. येतांना त्यांच्या हातात गांधीजींचा हसरा फोटो होता.आयुष्यभर गांधीवादी राहिलेल्या त्यांना आज या महात्म्याच्या हत्येच्या रोषाला बळी पडावे लागत होते..

रात्रीच्या अंधारात बैलगाडी चालू लागली. गण्याने पक्की सडक टाळायचा धूर्तपणा दाखवला होता. पलीकडे एक दोन मैलावर खिंडीमध्ये पलिते नाचताना दिसत होते. काय झाले असते या विचारानेच अंगावर सरसरून काटा आला. बर्वे हात जोडून बसले होते. बोकिलांनी मस्त ताणून दिली होती. सुखी माणूस..डॉक्टरांच्या मनात विचार आला.

" गण्या, एस टी च्या स्टँडावर घे म्हणजे आम्ही सुटलो..पुण्याला जाऊन बघावं म्हणतोय "

" डॉक्टर, स्टँडावर बी वाट बघत असत्याल.."

" मग रे.. ??"

"दमा कि वाईच.. टूरिंग थेटरचा मुक्काम उठलाया.. ती बी जाणार हाईत पुण्याला.. मालक माज्या ओळखीचा हाय. कायतरी येवस्था करतो "

रात्रीचे गार वारे सुटले होते. डोळे पेंगत असले तरी झोप लागत नव्हती. काळरात्र होती ती. आकाशात चंद्राला काळ्या ढगांनी गवसनी घातली होती. मिणमिणत्या चांद्ण्यांचाच काय तो आधार होता.

आपल्यामागे घराचे काय झाले असेल ? विचार स्वस्थ बसत नव्हते. त्याच वेळी जिवाची भीतीही वाटत होती.