Saturday, October 17, 2009

कॉस्च्यूम

"तू खूप गूढ आहेस "

ती त्याच्या खांद्यावर डोके घुसळत म्हणाली.

तो नुसतंच हुंकारला. ती त्याच्या टप्पो-या डोळ्यांत पहात राहिली.

"भोवळ येईल इतकी खेचली जाते रे तुझ्या डोळ्यांत.. खरेच किती गुरफटलेय ना मी. ."

मद्याचे घोट घेत घेत तो गच्चीच्या टोकाला जाऊन उभा राहिला. खाली पार्टी चालू होती. दोघेही नजर चुकवून वर आले होते.. मोकळ्या हवेत.

" आज तू सर्वांचे लक्ष वेधून घेतलेस.. सर्वात वेगळा कॉस्च्यूम तुझाच ठरलाय.. तुला कसे काय सुचले रे असे ?"

तॉ फक्त हसला. ड्रॅक्यूलाच्या कॉस्च्यूममध्ये तो खरेच आकर्षक दिसत होता. आणि काउंट ड्रॅक्यूलाची ती अदब, तो थाट त्याच्या हालचालींमधून प्रतीत होत होता.

" सुचले वगैरे नाही.. काल मला ते दुकान पहिल्यांदा दिसले. इतक्या दिवसात लक्ष गेले नव्हते पण कॉस्च्यूम ची दुकाने शोधतांना ते नजरेला पडले. आत गेलो. दुकान दार मला एकसे एक कॉस्चूम दाखवीत होता. पण माझी नजर वर टांगलेल्या या कॉस्च्यूम वर गेली आणि मग इतर गोष्टींवरचे मनच उडाले. दुकानदार मात्र इतर कॉस्च्यूमबाबत आग्रही होता.. मला तर तो त-हेवाईकच वाटला. बरं भाड्याचे म्हणावे तर सगळ्यात महागडा कॉस्च्यूम हाच आहे आणि आश्चर्य म्हणजे.. मापं जशी काय माझ्याचसाठी शिवलेली.. "

"कुठले रे दुकान ?"

" अगं.. काळाघोडा चौकातून लेफ्ट घेतल्यावर ईराण्याची बेकरी आहे ना.. तिच्याच बाजूला.."

" तिथे ? कधी पाहीले नाही.."

"तेच तर सांगतोय ना.. मी ही पाहीले नव्हते. पण काम तर झाले ना.."

"ए, खरं सांगू.. तुझी भीतीदेखील वाटतेय आज. "

त्याने हसून तिच्याकडे पाहीले. ...

"बघ हं.... तुला काय माहिती मी कोण आहे !! "

" खरंच रे, मला काहीही माहिती नाही.. तू माझ्या आयुष्यात येतोस काय, मी तुझ्यात गुरफटते काय.. आणि तुझ्याबद्दल, तुझ्या गत आयुष्याबद्दल एका शब्दानेही काहीही माहीत नसताना तुझी होते काय.. सगळंच गूढ आहे बाबा.. तू तरी सांग ना तुझ्याबद्दल "

"काय सांगू ?"

" हेच.. तुझ्याबद्दल सर्व काही .."

"मग हेच समज कि मला गत आयुष्यच नाही "

" कि सांगायचे नाही ?"

" कदाचित सांगण्यासारखे काही नसेल ! "

" हुं.....! " तिचे सर्व प्रयत्न पुन्हा वाया गेले होते..."

"आज मला घरी सोडशील ?"

" माय प्लेझर .." हात पुढे करत आणि गुडघ्यात किंचितसे अदबीने वाकत त्याने म्हटले..

ते दोघेही पुन्हा पार्टीत शिरले. तो खरोखरच गर्दीचे आकर्षण ठरला होता. कित्येक मुली आणि बायकाही त्याच्या भोवती घुटमळत होत्या. ड्रॅक्यूलाच्या त्या कॉस्च्यूममध्ये तो अगदी रूबाबदार दिसत होता. मुखवटेधारी त्या पार्टीमध्ये तो हिरो ठरला होता.

" ऐक ना, हा कॉस्च्यूम मला परत करायचाय. दुकानदाराने बजावलेय दहादा. रात्री अकरा वा. दुकान बंद होते त्याचे.. पण नंतर अर्धा तास थांबणार आहे तो. रात्री बारा च्या आत त्याला तो कॉस्च्यूम परत हवाय "

तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. " राहू देत, उद्या सांगूयात त्याला काहीतरी.. नाहीतर फोन करून सांगून टाक त्याला "

" नाही नाही.. मी शब्द दिलाय त्याला.. काहीही करून गेले पाहीजे "

तिचा नाईलाज झाला. दोघही पार्किंग लॉट मध्ये आले तेव्हां थंड वारे सुटले होते. मलबार हिल ला अजूनही जाग होती. मुंबईचे मनोहारी दॄश्य दिसत होते. खाली त्याची स्पोर्टस कार उभी होती.

सातव्या मिनिटाला ते रस्त्याला लागले होते. भन्नाट वेगात त्याची कार धावत होती. ती कौतुकाने त्याच्याकडे पाहत होती.

रस्त्यावर फारशी गर्दी अशी नव्हतीच. काळा घोडा चौकाला वळसा घालून गाडी बेकरीसमोर थांअली केव्हां हे तिला कळलेदेखील नाही. गाडी बाजूला घेत चटकन उतरून त्याने तुच्याकडचा दरवाजा उघडला आणि तिला उतरण्यासाठी हात दिला.. किती अदब आहे याच्यात... तिच्या मनात विचार येऊन गेला.

बेकरी चालू होती पण शेजारी ते दुकान दिसत नव्हते.

" अरे , इथूनच तर घेतला ना मी हा कॉस्च्यूम.." तो नवल करीत उभा होता.

" आर यू शुअर , तू इथूनच घेतलास " इथे कुठेही ते दुकान दिसत नाहीय्ये...बघ आजूबाजूला "

त्याने बेकरीवाल्याला काहीतरी विचारले. त्याची मान नकारार्थी हलताना तिला दिसली. काहीतरी वेगळे घडतेय.. तिच्या संवेदनशील स्त्री मनाला इशारा मिळाला होता. तिने त्याला बोलूनही दाखवले. त्याने अपेक्षेप्रमाणेच ते उडवून लावले .

""हा कॉस्च्यूम आपण देऊन टाकूया कुणालातरी " ती पुन्हा पुन्हा म्हणत राहिली.

त्याला काहीच सुचत नव्हते. त्याने गाडीला स्टार्टर दिला आणि गिअर टाकला नाही तोच करकच्चून ब्रेकस लावले.

समोरच्याच इमारतीत ते दुकान होते आणि त्याच्या शेजारीही बेकरी होती. ..!!

तो आता पुरता गोंधळून गेलेला होता. पण दुकान तर सापडले या आनंदात तो गाडी बंद न करताच उतरला. चटकन तिला घेऊन दुकानात शिरताना त्याने गाडीकडे पाहीले देखील नाही.

घडी केलेला तो कॉस्च्यूम त्याने दुकानदारापुढे ठेवला तेव्हां दुकानदाराने त्याला कुठलाही प्रतिसाद दिला नाही.

" आपका ये कॉस्च्यूम... देखीये, आय हॅव केप्ट माय वर्ड.."

दुकानदाराने त्याच्याकडे थंड नजरेने पाहीले.

" नही चाहीये...!!"

त्याच्या डोक्यात ते वाक्य शिरायला वेळ लागला..

" क्या नही चाहीये ?"

" यह कॉस्च्यूम !!"

" क्युं ?"

" यह हमारा नही है ...!! "

आता चाट पडायची वेळ आली होती त्याच्यावर. काल आपण या दुकानातून हा कॉस्च्यूम घेतो काय, हा अटी घालतो काय आणि आता वेळ पाळली तर हा उलटतो काय..!

त्याने तावातावाने त्याच्याशी हुज्जत घालायला सुरूवात केली पण दुकानदाराची स्थितप्रज्ञता तसूभरही ढळली नव्हती.

" चल रे.. वाद नको घालूस. ती त्याला ओढतच म्हणाली "

तो गाडीत बसला तेव्हां डोके धरूनच बसला होता.

" आपण पुन्हा पार्टीत जॉईन व्हायचे का... तुला बरे वाटेल "

काही न बोलता त्याने गाडीला वेग दिला. गाडी मलबार च्या दिशेने धावू लागली......

पार्टी खालीच सोडून ते पुन्हा गच्चीवर बसले होते.. एकंदर घटनाक्रमाकडे पाहता ती चिंता व्यक्त करीत होती.

मद्याचे घोट घेतांना तो पुन्हा उत्तेजित झाला होता. तिची गंमत कराविशी त्याला वाटू लागली होती.

पुन्हा तो कॉस्च्यूम अंगावर चढवत त्याने तिला जवळ बोलावले. कदाचित ती या क्षणाची वाटच पहात असावी.

तिचा हात हातात घेत त्याने तिच्या खांद्यावरून दोन्ही हात मागे टाकले. तिच्या चेह-यावर मंद स्मित होते.

" तुला ऐकायचेय ना माझ्याबद्दल ?" चेह-यावरचे हसू दाबत शक्त तितक्या गंभीरपणे तो म्हणाला..

" तुला काय वाटले.. दुकानदाराने तो ड्रेस का परत घेतला नसावा ?" तिच्या डोळ्यांत रोखत त्याने विचारले.

पुन्हा मंद स्मित करत तिने नकारार्थी मान हलवली...

तिच्याकडे पाहत त्याने एकच वाक्य उच्चारले..

" कारण तो कॉस्च्यूम माझा आहे !!!"

,

,

,

तिच्या डोळ्यांत सावकाश भीती उमटत गेली. तिला तसे पाहून त्याला आणखीनच जोर आला. " या मुंबई शहरावर माझे साम्राज्य चालते. आणि त्यासाठी मला मदतनिसांची गरज लागते. मी त्यांना अधिकार देतो पण त्यांच्याकडून फक्त ताज्या रक्ताची अपेक्षा ठेवतो. "

" ........................................................ "

" आज तू माझी मदतनीस बनणार आहेस. आजची भाग्यवंत तू आहेस... आहेस ना तयार ?""

भीतीने तिचे डोळे विस्फारलेले होते....


त्याने तिला मिठीत ओढत तिच्या गळ्यावर आपले ओठ ठेवले मात्र..

वेदनेची एक कळ शिरशिरत त्याच्या ग़ळ्यात उतरली.

कण्हत तो बाजूला झाला तेव्हां ....

तिच्या ओठाला त्याचे रक्त लागले होते आणि बाहेर आलेले सुळे घेऊन ती भेसूर हसत होती....!!!

पुन्हा त्याच्या गळ्यात सुळे खुपसतांना ती त्याच्या कानात इतकेच पुटपुटली..

" कळाले ना तो कॉस्च्यूम त्याने माझ्यासमोर का परत घेतला नाही ?""

घड्याळात दूर कुठतरी पडणारे बाराचे टोल ऐकताना त्याची शुद्ध हरपत चालली होती...!!Maitreyee Bhagwat

6 comments:

Vibha said...

Chhan ahe gosht

Yawning Dog said...

Bharee ahe goshta !

Anonymous said...

sahiye gosht! end cha punch pun sahi yeto, unexpected!

Shardul said...

Bhannat ... !!!

डॉ.सुनील अहिरराव said...

ratnakar matkarinchya katha aathwalya.

अपर्णा said...

सही. एकदम भारी.